बससेवेला बंद करून देशाच्या भविष्याची जोखिम? Bus Transport Privatization

बससेवेला बंद करून देशाच्या भविष्याची जोखिम? Bus Transport Privatization

दुर्गम भागातील, कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करायचा निर्णय सरकारने चार दिवसांपूर्वी घेतला घेतला. नेमका त्याच दिवशी कर्मवीर भाऊराव पाटलांचा जन्मदिन होता.

तुम्हाला भाऊराव माहिती नसतील तर तुम्ही इथेच पोस्ट वाचायची सोडून द्या.

तर शिक्षण, शाळा, शिक्षक, शिक्षण विभागातले करोडोचे भ्रष्टाचार, गावाकडे राहायचं भाडं घेणारे पण गावात न राहणारे शिक्षक, आपल्या शिक्षणाची जगाला गवसणी घालणारी गुणवत्ता, साधं वाचू – लिहू न शकणारे चौथी पाचवीचे पोरं, वारे – डीसले यांच्यासारखे नवीन काहीतरी करू पाहणारे गुरुजी पण त्यांच्या प्रयत्नांना धुळीत मिळवायला टपलेले अधिकारी असा शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ ग्रामीण भागात सतत सुरू असतो.

त्यामुळे शिक्षणाच्या चांगल्या संधी शोधत शाळा संपल्या संपल्या ग्रामीण भागातील पोरं लगेच शहरातील चांगल्या कॉलेजात अ‍ॅडमिशन घेतात. चार पैशे जास्त देऊ पण आपल्या पोरांना चांगलं शिक्षण देऊ अशी पालकांची ईच्छा असते..

गाव आणि शहराच्या, आशेच्या आणि निराशेच्या, अंधार आणि उजेडाच्या दरीला जिने वर्षानुवर्ष कमी केलं ती होती एक परी – लाल परी.. मंडळाची बस..

ठिकठिकाणी शाळा कॉलेजात जाणार्‍या पोरांचे लोंढेच्या लोंढे बसची वाट पाहत असतात. काही ठिकाणी बसचे टाईमटेबल नुसते लटकवलेले असते, त्यातल्या वेळा पाळणार्‍या बस सोडा पण त्यात जितक्या दिल्या आहेत त्यातल्या निम्म्या जरी बस या मार्गांनी फिरकल्या तरी खूप कृपा होईल अशी परिस्थिती आहे..

नाशिक जिल्हय़ात जवळच्या गावांमध्ये citilinc या शहरातील बसची सेवा काही दिवस दिली गेली पण तिचं भाडं private गाड्यांपेक्षा जास्त असल्याने अनेक गरीब पोरांना ती परवडलीच नाही.

मंडळाच्या बसला विद्यार्थी पासला मिळणारा discount किंवा महिला वर्गाला लागू होणारे Half Ticket इथे चालत नाही, मग थाटामाटात सुरू केलेल्या अशा अनेक बस फेर्‍या बंद पडल्या. पुन्हा परिस्थिती जैसे थे.

लाल परीचा रंग बदलला तसा त्या परीचा आशिर्वाद ही कमी झाला आहे. ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढली त्या प्रमाणात बस वाढणं तर सोडा पण आहे त्या बस फेर्‍या कमी झाल्या. काही ठिकाणी तर बस यामुळे बंद झाल्या की ड्रायवर आणि कंडक्टरला रात्रभर झोपायची सोय गावात होत नाही.

काही ठिकाणी बस जातात पण त्यांचा काही काळवेळ नसतो, त्यामुळे त्यांच्या भरवशावर शाळा कॉलेज करणं अवघड होऊन जातं.

ज्या राज्यातील सरकारकडे मेट्रो, बुलेट ट्रेन, नदी सुशोभीकरण, फुलांची प्रदर्शनं, परदेश दौरे आणि अभ्यास दौरे, पुतळे, पार्क अशा कामांसाठी पैसा आहे त्यांच्याकडे बससेवेसारखी basic सेवा चालवायला पैसा नाही? आणि बस तोट्यात येते म्हणून बस बंद केली जाते?

म्हणजे उद्या पाणी पुरवठा विभाग तोट्यात गेला तर आपण लोकांना पाणी द्यायचं सुद्धा बंद करणार आहोत का? बससेवा ही मूलभूत सेवा आहे.. तिच्या असण्याने इतर विभाग जसे शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, निवडणूक आयोग, कृषी विभाग अशा कितीतरी विभागांच्या कार्यक्रमांना बळकटी मिळू शकते..

मग अशा काही विभागांच्या बजेटमधून बससेवेला बळकटी का दिली जात नाहीये? आमच्या पोरांना गरीब आणि अशिक्षित ठेवून नेमका कुणाचा फायदा होत आहे?

आपल्या देशाला विश्वगुरू करायचं असेल तर आपल्या पोरांना चांगलं शिक्षण मिळणं आणि चांगल्या करियरच्या संधी मिळणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी बससेवा सुरळीत व्हायलाच हव्यात. नाहीतर हीच पोरं दंगलीत, जाळपोळीत, गुन्हेगारीत, अवैध धंद्यात सापडतील आणि त्याचंही खापर नेहरूंच्या डोक्यावर फोडावं लागेल.

Content Credits वाचनीय लेखChangdeo Gite (आबा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *